‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार

‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार

सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ परीक्षा रविवार, ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.
सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ परीक्षा रविवार, ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आणि मुंबई विद्यापीठाच्या समन्वयाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध २८ महाविद्यालयांतील केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे.

मुंबईतील २८ केंद्रांवरून १४ हजार ४२६ विद्यार्थी ‘सेट’ परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठात होत असलेल्या या परीक्षेच्या यशस्वी नियोजनासाठी मुंबई शहर केंद्र प्रमुख म्हणून इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. शिवाजी सरगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण २८ महाविद्यालयांतील केंद्रांवर ही परीक्षा सुरळीतरित्या पार पडण्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व केंद्र प्रमुखांना योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे प्राध्यापक डॉ. शिवाजी सरगर यांनी सांगितले. परीक्षेसंबंधित कोणतीही गैरसोय होऊ नये आणि विविध शंकांचे निरसन करण्यासाठी परीक्षार्थींनी मोबाइल क्रमांक ९८६९०२८०५६ वर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment