हस्तकला आणि पारंपरिक कलेला आधुनिक बाजारपेठ मिळावी तसेच महिलांना आणि आदिवासी कारागिरांना आर्थिक स्वावलंबन मिळावे, या उद्देशाने काव्हीं इंडिया संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत बांबू, शेण आणि अन्य पर्यावरणपूरक उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अनेक पारंपरिक कारागिरांना त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
महिला उद्योजकांचा पुढाकार
ही संस्था चिन्मयी सुकथनकर, नेहा अग्रवाल आणि संगीता गवळी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली असून, या महिला उद्योजकांनी हस्तकला कारागिरांच्या उत्पादने अमेझॉनसारख्या आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विक्रीस उपलब्ध करून दिली आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमेझॉनने विशेष दाद दिली आहे.
अमेझॉन सहेली कार्यक्रमामुळे वाढलेली संधी
ऑगस्ट २०२४ मध्ये काव्हीं इंडिया अमेझॉन सहेली कार्यक्रमाचा भाग बनली. या उपक्रमामुळे संस्थेच्या उत्पादनांना भारतभर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी मागणी निर्माण झाली. ई-कॉमर्स विक्रीच्या आधुनिक तंत्रांचा उपयोग केल्याने अवघ्या काही महिन्यांतच संस्थेचा व्याप आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हैदराबाद, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये पसरला.
महिला आणि आदिवासी कारागिरांना आर्थिक स्वावलंबन
या उपक्रमामुळे १८ ते ७० वयोगटातील ५० हून अधिक महिला आणि आदिवासी कारागिरांना रोजगार मिळाला आहे. परंपरागत कौशल्ये आणि आधुनिक विक्री तंत्र यांचे समन्वय साधल्याने या उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांना सक्षम करण्याच्या या प्रवासात काव्हीं इंडिया संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांच्यामुळे महिला कारागिरांना स्थिर आणि सन्मानजनक उत्पन्न मिळण्यास मदत झाली आहे.