अजित पवार : अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना लाभ नाही ,जालना, ता. २० : ‘लाडकी बहीण योजना’ गरीब व गरजू महिलांसाठीच आहे. खुरपणी, धुणीभांडी करणाऱ्या महिलांसाठी दीड हजार रुपये खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन जालन्यात सोमवारी (ता. २०) झाले. यावेळी पवार म्हणाले, “गरजूंना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीच शासनाने ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. मात्र, सुरुवातीला योजनेत काही त्रुटी होत्या, त्या काढण्यासाठी वेळ मिळालेला नाही. यापुढे या योजनेचा लाभ फक्त अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच मिळेल.”
योजना गरजूंसाठीच आहे
पवार पुढे म्हणाले, “प्राप्तीकर भरणाऱ्या महिलांसाठी ही योजना नाही. ज्यांचे मासिक उत्पन्न २१ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांनी स्वतःहून या योजनेच्या लाभासाठी पात्र नसल्याचे जाहीर करावे.”
‘लाडकी बहीण योजना’साठी सरकारने तीन हजार ७०० कोटी रुपयांचा निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग केला आहे. २६ जानेवारीपासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी माहितीही पवार यांनी दिली.
मागील काळातील संघर्ष
जलसंपदा मंत्री म्हणून मराठवाड्यात गोदावरी नदीच्या पात्रावर बंधारे बांधले. मात्र, त्यावेळी राजकीय आरोपांमुळे पंधरा वर्षे चौकशांचा सामना करावा लागला. या काळात मला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र, चौकशांमध्ये काहीच निष्पन्न झाले नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.