शिक्षक भरती प्रक्रिया २०२४
Maharashtra Teacher Recruitment 2024 : आरक्षण हे मागास प्रवर्गांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याचे एक साधन आहे, आणि त्याचा उद्देश या वर्गाला कायम मागास ठेवणे नाही. सदर भरती प्रक्रियेतील आव्हान असलेली अट ही मागास प्रवर्गातील उमेदवारांना मुख्य प्रवाहात येण्यापासून अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे मूळ आरक्षणाचा उद्देशच अपयशी ठरत असल्याने, ती अट संविधानविरोधी ठरवावी, असे अॅड. शेळके यांनी म्हटले आहे.
शिक्षक पदाच्या भरतीसाठी शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) मध्ये आरक्षणाचा लाभ घेतल्यास, शिक्षक अभियोग्यता चाचणी (टीएआयटी) मध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसोबत किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात जाऊ देण्यास प्रतिबंध करणारी अट संवैधानिकदृष्ट्या घटनाबाह्य आहे, आणि ती रद्द करावी, असा दावा तीन याचिकांमध्ये करण्यात आला आहे. या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून ती याचिका निर्णयासाठी राखून ठेवण्यात आली आहे.
लुकमन हन्नन शेख, दिपाली रमेश पवार, उषा शंकरराव केंढे आणि इतर अकरा जणांनी अॅड. देविदास आर. शेळके आणि अॅड. सुनील राठोड यांच्या माध्यमातून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेत दिलेल्या युक्तिवादानुसार, या धोरणामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद १४, १६(१) आणि १६(४) चा भंग होत असून, समानतेच्या घटकांना अपमानित केले जात आहे आणि आरक्षणाचा मूळ हेतू साधता येत नाही.