सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी जून महिना मोठी संधी घेऊन आला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये एकूण 44,500 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. रेल्वे, बँकिंग, संरक्षण दल आणि कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) ही भरती राबविण्यात येणार आहे.
कर्मचारी निवड आयोगाच्या संयुक्त पदवीधर स्तर (SSC CGL) परीक्षेद्वारे 12,256 पदे भरली जाणार आहेत. विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमधील अधिकारी व लिपिकीय पदांसाठी ही भरती होत असून इच्छुक पदवीधर उमेदवारांना 22 जून 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

रेल्वे क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या 11,127 रिक्त जागांसाठी अर्ज मागविले आहेत. दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेडमधील आयटीआय किंवा डिप्लोमा धारक उमेदवारांना 14 जून 2026 पर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.
संरक्षण क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवकांसाठी संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा (CDS-II) अंतर्गत 451 पदांची भरती जाहीर केली आहे. तसेच राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA-II) आणि नौदल अकादमीसाठी 394 जागांवर भरती केली जाणार आहे. या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जून 2026 आहे.
भारतीय हवाई दलात फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी शाखांमधील 379 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना 19 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.
बँकिंग क्षेत्रातही भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 7,150 अप्रेंटिस पदांसाठी तर बँक ऑफ बडोदामध्ये 5,000 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या दोन्ही भरतींसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2026 आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि सरकारी सेवेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि सरकारी सेवेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी जून महिन्यातील या भरती मोहिमा सुवर्णसंधी मानल्या जात आहेत.