लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा धनवर्षाव

विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित झालेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अखेर पुन्हा सुरू झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दरमहा १५०० रुपये थेट खात्यात जमा करण्याची ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केली होती. या योजनेचा लाभ तब्बल अडीच कोटी महिलांना झाला. मात्र, निवडणुकीनंतर योजनेचे पुढील वितरण कधी सुरू होईल, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता होती.

महायुतीच्या जाहीरनाम्यात प्रत्येक महिन्याला २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यामुळे महिलांमध्ये नव्या रकमेच्या प्रतीक्षेबाबत अनेक शंका होत्या. मात्र, सध्या १५०० रुपयांचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यातील सर्व महिलांना मदतीचा हात
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “२६ जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यांमध्ये योजनेचा हप्ता जमा केला जाईल.” महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. योजनेचे पुढील टप्पे कधी सुरू होणार आणि २१०० रुपये दरमहा देण्याचे आश्वासन कधी पूर्ण होणार, याकडे आता महिलांचे लक्ष आहे.

Leave a Comment