महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची नवी तारीख महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केली !
MPSC Exam 2024 : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची नवी तारीख महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केली आहे. कुणबी नोंदींच्या आधारे ज्यांना जात प्रमाणपत्र मिळाले आहे अशा उमेदवारांना इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याची संधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिली आहे. याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
ही पूर्व परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
अर्ज कधी सादर करायचे?
- अर्ज सादर करण्याचा कालावधी :31 मे दुपारी 14.00 ते 7 जून
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : 7 जून
- स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी प्रत : 9 जून
- चलनाद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : 10 जून
किती पदासांठी परीक्षा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रथम 274 जागांसाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे जाहिरात प्रसिद्ध केली होती. महाराष्ट्र सरकारनं फेब्रुवारी महिन्यात राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा मंजूर केला होता. राज्य सरकारनं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाची निर्मिती करुन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं होतं. याचा आधार घेत लोकसेवा आयोगानं शुद्धीपत्रक जारी करत मूळ जाहिरातीत बदल करत नव्यानं 250 जागांचा समावेश करण्यात आला होता. आता ही परीक्षा एकूण 524 जागांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
21 जुलै रोजी परीक्षा
डिसेंबर 2023 मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पूर्व परीक्षा 28 एप्रिल रोजी होणार होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नव्या शुद्धीपत्रकानुसार ही परीक्षा 21 जुलै रोजी होणार आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- 2024 ही राज्य सेवा परीक्षेअंतर्गत विविध पदांच्या 431 जागांसाठी ही परीक्षा होईल.
तर,महाराष्ट्र वनसेवा परीक्षेअंतर्गत 48 पदांची भरती होणार आहे. सहायक वनसंरक्षक गट अ 32 पदे, वनक्षेत्रपाल गट-ब 16 पदांसाठी भरती होणार आहे.
परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या परीक्षेच्या जाहिरातीनुसार पूर्व परीक्षा 28 एप्रिल रोजी होणार होती. मात्र, लोकसेवा आयोगानं शुद्धीपत्रक जारी करत 250 जागांची वाढ केली होती. त्यावेळी मराठा आरक्षणासह जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळी परीक्षेची तारीख 6 जुलै निश्चित करण्यात आली होती. आता नव्यानं कुणबी नोंदीद्वारे ज्यांना इतर मागास प्रवर्गाचं प्रमाणपत्र मिळालं असेल ते उमेदवार देखील अर्ज दाखल करु शकतात. आता ही परीक्षा 21 जुलै रोजी होणार आहे.