मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या !
Mumbai University Exam Updates :
रविवार ७ जुलै पासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, पावसाचा हा जोर सोमवार ८ जुलैलाही कायम आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा आणि कॉलेजांना मुंबई पालिकेच्यावतीने सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई विद्यापीठानेही आयडॉलच्या आजच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पावसामुळे प्रवासात विद्यार्थ्यांनाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई विद्यापीठाने ८ जूनच्या रोजीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, या परिक्षणाची नवीन तारीखही जाहीर केली आहे.
मागच्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यभरातील विविध ठिकाणाचे रस्ते जलमय झाले असून नद्या ओसंडून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईतील शाळांना (सकाळ सत्रातील) आणि कॉलेजांना सुट्टी जाहीर केली होती. शिवाय, पावसामुळे मुंबईतील लोकलसह वाहतुकीच्या इतर सुविधाही कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठानेही त्यांच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने नुकतीच याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे.
आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान खात्यानेही येत्या काही तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंघाने मुंबई, ठाणे जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व माध्यमांच्या आणि मंडळाच्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालकांची शाळा-कॉलेजांमध्ये ये-जा करण्याची गैरसोय होऊ नये. याचा विचार करत विद्यार्थी आणि पालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.
यासोबतच, मुंबई विद्यापीठाच्या सीडीओई (Mumbai University CDOE) म्हणजेच आयडॉलच्या आज ११ ते २ या सत्रात काही परीक्षा नियोजित होत्या. मात्र, पावसाचा जोर पाहता मुंबई विद्यापीठाने आजच्या परीक्षा रद्द करून त्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवाय, आज रद्द करण्यात आलेल्या परीक्षा शनिवार, १३ जुलै २०२४ रोजी नियोजित वेळेत आणि नियोजित परीक्षा केंद्रावर पार पडतील, असेही विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.