RTE तून प्रवेश घेण्याला मुदतवाढ; पालकांना मुलांचे प्रवेश ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार
RTE Admission 2024 :
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (right to education admission) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर मुलांचा प्रवेश घेण्याला पालकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने, प्रवेश घेण्याला ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश जाहीर होऊन, काही कारणास्व प्रवेश न घेतलेल्या मुलांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. या मुदतवाढीमुळे प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभागाने फेब्रुवारीमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांच्या विरोधात सामाजिक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे न्यायालयीन प्रकरण सुमारे दोन महिने सुरू होते. अखेर शिक्षण विभागाने केलेला बदल न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला. त्यामुळे शिक्षण विभागाला पूर्वीप्रमाणेच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवावी लागत आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुमारे दोन महिने चालल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. या काळात पालकांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांचे प्रवेश खासगी शाळांमध्ये शुल्क भरून केले. त्यामुळे आता आरटीईतून प्रवेश घेण्याला पालक उत्सुक दिसत नाही.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये एक लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून ९३ हजार ९ मुलांना प्रवेश जाहीर झाला, तर प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २३ ते ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत ३९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. मात्र, ही संख्या कमी असल्याने, प्रवेश घेण्याला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रवेश घेण्याला ५ ऑगस्टपर्यत मुदतवाढ मिळाली. पालकांनी अधिक माहिती आरटीईच्या वेबसाइटशी संपर्क साधण्याचे आवाहन गोसावी यांनी केले आहे.