बालभारतीत कुशल मनुष्यबळ नसल्याने पाठ्यपुस्तकांमध्ये चुका होण्याचे प्रमाण वाढणार; ८० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त!

बालभारतीत कुशल मनुष्यबळ नसल्याने पाठ्यपुस्तकांमध्ये चुका होण्याचे प्रमाण वाढणार; ८० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त!

SCERT Maharashtra, Balbharti : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) इयत्तानिहाय अभ्यासक्रम तयार करण्यात येतो. या अभ्यासक्रमातील शैक्षणिक घटकांच्या आधारे पाठ्यपुस्तकांची निर्मिती; तसेच त्यानंतर पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम बालभारतीकडून होते. मराठी, इंग्रजी, हिंदीसह दहा माध्यमांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती होते. त्यासाठी विषयसमित्या आणि विशेषाधिकारी काम करतात. सद्यपरिस्थितीत पाठ्यपुस्तकांचा मजकूर, डिझाइन, निर्मिती आणि वितरणासाठी बालभारतीकडे पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळच उपलब्ध नाही

राज्यातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांनी समृद्ध करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात (बालभारती) कर्मचाऱ्यांच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ नसल्याचा फटका पाठ्यपुस्तकांच्या गुणवत्तेवर पडत असून, पाठ्यपुस्तकांमध्ये चुका आढळून येत आहे. बालभारतीमधील रिक्त पदांवर भरती करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिल्यानंतरही पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये दर महिन्याला भरच पडत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या, बालभारतीला कुशल शैक्षणिक मनुष्यबळ उपलब्ध होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Balbharti

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) इयत्तानिहाय अभ्यासक्रम तयार करण्यात येतो. या अभ्यासक्रमातील शैक्षणिक घटकांच्या आधारे पाठ्यपुस्तकांची निर्मिती; तसेच त्यानंतर पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम बालभारतीकडून होते. मराठी, इंग्रजी, हिंदीसह दहा माध्यमांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती होते. त्यासाठी विषयसमित्या आणि विशेषाधिकारी काम करतात. सद्यपरिस्थितीत पाठ्यपुस्तकांचा मजकूर, डिझाइन, निर्मिती आणि वितरणासाठी बालभारतीकडे पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळच उपलब्ध नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ मार्च २०२३ रोजी बालभारतीसाठी एकूण ३४५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २७७ पदे रिक्त आहेत. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत ७९ अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होणार आहे.

सध्य परिस्थितीत रिक्त पदांची संख्या ३०० पर्यंत गेली आहे. अशावेळी गरजेनुसार कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. मात्र, नियमित भरती बंदच आहे. त्यामुळेच पाठ्यपुस्तक निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विद्या विभागात ३० पैकी केवळ पाच अधिकारी कार्यरत आहेत. हे अधिकारीही येत्या काही दिवसांत निवृत्त झाल्यानंतर, नव्याने भरती होणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी कोणीच राहणार नाही. त्यामुळे भविष्यात पाठ्यपुस्तकांची निर्मिती कशी होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीत समीक्षण, मुद्रितशोधन, गुणवत्ता परीक्षण, ट्राय़आउट असे महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, मनुष्यबळ नसल्यामुळे, या प्रक्रियांवर ताण येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच पाठ्यपुस्तकांमधील चुका समोर येऊन, बालभारतीची नाचक्की होते. या पार्श्वभूमीवर रिक्त पदांवर तातडीने भरती व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे.

महत्त्वाचे विषय विशेषाधिकारीविना-
विज्ञान, हिंदी, गणित, विज्ञान, इतिहास, इंग्रजी अशा विषयांसाठी विशेषाधिकारी उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे पुस्तकांचा मजकूर उत्कृष्ट पद्धतीने तयार होण्याची जबाबदारी असणाऱ्या विद्या विभागात ३० पैकी पाच अधिकारी कार्यरत आहेत. अशीच परिस्थिती निर्मिती आणि वितरण विभागात आहे. एक अधिकाऱ्यावर साधारण पाच प्रकारचे अतिरिक्त कार्यभार आहे. अशीच परिस्थिती उर्दू, तेलगू, गुजराती माध्यमांच्या पुस्तकांच्या बाबतीत आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या माध्यमातून चुकीची माहिती गेल्यास, त्याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Leave a Comment